उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक-३ परिसरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळ समाज परिसरात रेल्वे ट्रॅकच्या कडेला एक इसम गांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सापळा रचून छापा टाकत मोठी कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी इम्तियाज उर्फ पप्प्या युसुफलाला (वय ४०) याला गांजाची विक्री करताना रंगेहात पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ५३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत सुमारे ९ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी इम्तियाज उर्फ पप्प्या युसुफलाला याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक शितल बामणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने केली. या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे, पोलीस हवालदार अनिल पाटील, प्रमोद जाधव, चंदू शिंदे, हांडे, देशमुख तसेच निलेश नांगरे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. शहरात अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले





























