- लोकअदालतच्या पार्श्वभूमीवर ‘अभय योजना‘ जाहीर
- पाणीपट्टी थकबाकीवरील शास्तीमध्ये १००% सूट
उल्हासनगर दि १३ : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवारी दिनांक १३ मार्च २०२६ रोजी महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी स्वतः शहरात विविध ठिकाणी फिरून नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले. वारंवार सूचना देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांवर आता ‘जप्ती’ सारखी कठोर कायदेशी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
यावेळी आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) त्यांनी गोल मैदान, उल्हासनगर-१, कृषी विभाग कार्यालय, उल्हासनगर-४, गुरूनानक शाळेजवळ, उल्हासनगर-४ येथील किऑस्क सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन किऑस्क सेंटरवर सुरू असलेल्या प्रक्रियेची पाहणी केली आणि थकीत कर वसुलीला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दिले. राष्ट्रीय लोकअदालतीचे औचित्य साधून पाणी पुरवठा विभागाने सन २०२५-२६ करिता विशेष सवलत जाहीर केली आहे. थकबाकीसह चालू मागणीचा एकरकमी भरणा केल्यास विलंब शास्तीवर (Penal Interest) १००% सूट देण्यात येईल. ही योजना घरगुती आणि बिगर-घरगुती अशा दोन्ही प्रकारच्या नळजोडणी धारकांसाठी लागू आहे. सदर योजना केवळ १३ मार्च २०२६ ते १६ मार्च २०२६ या चार दिवसांच्या मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असेल.

या आवाहनात्मक मोहिमेत आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या सोबत उपआयुक्त श्रीम. विशाखा मोटघरे, कर निर्धारक व संकलक श्रीम. निलम कदम, सहा. आयुक्त गणेश शिंपी, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, कर निरीक्षक व वसुली लिपिक सहभागी झाले होते.

“नागरिकांनी जप्तीसारखी कठोर कारवाई टाळण्यासाठी आणि शास्ती माफीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आपली पाणीपट्टी व मालमत्ता कर त्वरित जमा करावा. आपल्या कराचा पैसा हा शहराच्या दर्जेदार सोयी-सुविधांसाठीच वापरला जातो. सहकार्य करा आणि जबाबदार नागरीक बना”, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी नागरिकांना केले आहे.






























