उल्हासनगर दि. २२ ( प्रमोद दळवी ) : गुरुवारी सायंकाळी उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ५ मधील कैलास कॉलनी येथे जुन्या वादातून एका टोळीने बेछूट गोळीबार करून सात राउंड फायर केले होते. त्या गोळीबारात अनिल चौहान व अमन चौहान यांचा मृत्यू झाला होता तर अर्जुन चौहान हा गंभीर जखमी झाला होता. गोळीबार करून आरोपी पसार झाले होते. उल्हासनगर गुन्हे शाखा घटक – ४ च्या पोलिसांनी या गुन्ह्यातील पसार झालेल्या आरोपींपैकी शेखर तुकाराम बिराजदार (२५ ) व अजय राव(२३ ) या दोघांना वांगणी शेलु परिसरातून झडप घालून ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -५ मधील कैलास कॉलनी परिसरात जुन्या वादातून तसेच अजय राव याने केलेल्या अपघातामुळे त्यास मारहाण झालेल्या रागातून त्याचे साथीदार शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, अजित शेख, आदालत बद्दिन खान,अजय राव व इतर ४ ते ५ अनोळखी साथीदारांनी गुरुवारी सायंकाळी दीपक ठाकूर हे आपल्या जनसंपर्क कार्यालयात मित्रांसोबत बसले असताना या टोळीने त्या ठिकाणी येऊन बेछूट गोळीबार केला. जवळपास ७ राऊंड त्यांनी फायर केले होते. त्या गोळीबारात अनिल चौहान अमन चौहान व अर्जुन चौहान हे तिघेही जखमी झाले होते. त्यांना उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता अनिल व अमन चौहान या दोघांचाही मृत्यू झाला. तर अर्जुन हाच गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी पुढे हलवण्यात आले. या गोळीबाराच्या घटनेमुळे उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांडची माहिती हिललाईन पोलिसांना मिळतात त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. गोळीबारात मयत झालेल्या अनिल व अमन हे दोघे सख्खे भाऊ असून त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याने नक्की या घटनेमागचा खरा प्रकार काय आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दीपक ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, अजय राव, अजित शेख व आदालत खान व इतर ४ ते ५ त्यांच्या अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ दिवसांपूर्वी हप्ता न दिल्याने एका टेम्पो चालकावर हल्ला झाला होता. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. तसेच टेम्पो पार्किंगच्या वादातून अनिल चौहान याने बलवीर व शेखर बिराजदार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीचा राग मनात धरून २८ एप्रिल रोजी आरोपींनी साथीदारांसह अनिल चौहान यांच्या घरी जाऊन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. अशी माहिती तपासात पोलिसांना समजली आहे. दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपींचा शोध कार्य सुरू केला आहे. या गुन्ह्याचा तपास हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस एल कैलासे करीत आहेत. याशिवाय या गोळीबार व दुहेरी हत्याकांडाचा तपास देखील उल्हासनगर गुन्हे शाखा घटक -४ पोलीस करीत असताना पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराने हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी शेखर बिराजदार व त्याचा सहकारी अजय राव हे दोघेही शेलु वांगणी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती दिली. उल्हासनगर गुन्हे शाखा घटक -४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार, पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, योगेश वाघ, शेखर भावेकर, रितेश वंजारी, सतीश सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल रामदास उगले, बाबू जाधव व पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद तोंडलीकर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या ठिकाणी सापळा रचून शेखर बिराजदार व अजय राव यांना झडप खालून ताब्यात घेतले. चौकशीमध्ये आरोपी शेखर बिराजदार यांच्याविरुद्ध यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून तो जामिनावर होता. तसेच हिललाईन पोलीस ठाण्यात शेखर व अजय राव या दोघांविरुद्ध रायटिंगचे गुन्हे दाखल आहेत असे पोलिसांनी सांगितले.

या गुन्ह्यातील फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. गोळीबार व दुहेरी हत्याकांडच्या या घटनेमुळे उल्हासनगरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जुन्या वादविवादातून ही घटना घडली असल्याचे बोलले जात असले तरी या घटनेमाचं नक्की कारण काय आहे व या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचाही तपास पोलीस करणार असल्याचे बोलले जात आहे.





























