उल्हासनगर दि . १८ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -३ परिसरातील कल्याण अंबरनाथ रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. १७ सेक्शन येथील पेट्रोल पंपा समोरील रस्ता व उल्हासनगर महानगरपालिकेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी रस्त्यामध्ये नवीन चेंबरचे ही बांधकाम करण्यात आले आहे. पण हा रस्ता जरी चांगला दिसत असला तरी रस्त्याच्या मधोमध एक सांड पाण्याचा चेंबर बऱ्याच दिवसापासून तुंबलेल्या अवस्थेत आहे. त्यात तुंबलेल्या चेंबर मधून सकाळ संध्याकाळ सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या सांडपाण्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेकडे जाणारा हा रस्ता असून या रस्त्यावरील या तुंबलेल्या चेंबर मधून सांडपाणी वेगाने वात असून याकडे मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे याकरिता महापालिका प्रशासन परिपूर्ण प्रयत्न करत आहे. पण पालिकेच्याच रस्त्यावर घाणीचे साम्राज्य आणि तुंबलेले चेंबर दिसून येत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे महापौर शहरात फिरून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे महानगरपालिकेच्याच रस्त्यावर घाणीचे साम्राज्य दिसून येत असल्याने याकडे महापौरांचे दुर्लक्ष का असाही प्रश्न सर्वत्र व्यक्त केला जात आहे. कल्याण अंबरनाथ रस्त्याचे खोदकाम मोठ्या वेगाने ही काही ठिकाणी सुरू आहे. एकीकडे धुळीचे साम्राज्य तर दुसरीकडे रस्ता खोदकाम करताना काही ठिकाणी तुंबलेल्या नाल्याही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा बोजबारा उडाला आहे.





























