मातोरी दि. ८ : जिल्हा परिषदेच्या मातोरी येथील आदर्श शाळेच्या दारात गुरुवारी सकाळी एक वेगळीच झळाळी दिसत होती. रांगोळ्यांनी सजलेला परिसर, विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे, सुसंस्कृत शिस्त आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे असलेले लेझीम पथक! कारणच तसे होते अंबड-सातपूर येथील नामवंत जीएसके ग्लॅक्सो स्मिथ क्लाईन फार्मासिटिकल कंपनीचे एकूण १२० अधिकारी व कर्मचारी या आदर्श शाळेला भेट देण्यासाठी आगमन करणार होते.
पाहुण्यांचे स्वागत अत्यंत पारंपरिक पद्धतीने, शाळेच्या लेझीम पथकाने केले. ढोलच्या निनादात, घोषणांच्या जयघोषात, पाहुण्यांचा शाळेच्या प्रवेशद्वारातून आत येताना झालेला उत्साह डोळ्यांत साठवण्यासारखा होता. पाहुण्यांनी प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी नृत्य, भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपल्या कलागुणांचा आविष्कार सादर केला. लहानग्यांनी आपल्या निरागस भावनांनी भारावून टाकले, तर मोठ्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांमधून आत्मविश्वास आणि जागरूकतेचे दर्शन घडवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील शाळेच्या विद्यार्थिनींनी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांसमोर अतिशय प्रभावी आणि निर्भीड पद्धतीने केले, हे विशेष कौतुकास्पद ठरले.
सांस्कृतिक सादरीकरणानंतर जे घडले ते या भेटीचे खरे सौंदर्य होते. काही विद्यार्थिनींनी पाहुण्यांची मुलाखत घेण्याचा धाडसी व अभिनव प्रयोग सादर केला. कोणतेही संकोच न करता विद्यार्थिनींनी पाहुण्यांशी संवाद साधत प्रश्न विचारले, त्यांची उत्तरे ऐकली. इतक्या लहान वयात अशी आत्मप्रत्ययाने ओतप्रोत भरलेली मुलाखत पाहून उपस्थित अधिकारी देखील थक्क झाले. “आम्हाला वाटले नव्हते की गावातील मुलामुलींमध्ये इतका आत्मविश्वास आणि तयारी असेल,” असे उद्गार अनेक पाहुण्यांनी ऐकवले.
पाहुण्यांनी केवळ शाळेच्या एकंदर वातावरणाचे कौतुक केले नाही, तर त्यांनी शाळेसाठी सुमारे २०,००० रुपये किमतीच्या शैक्षणिक व उपयुक्त वस्तूंचे वाटपही केले. अभ्यास साहित्य, स्वच्छता साहित्य, सॅनिटरी नॅपकिन्स, हॅण्डवॉश पाउच इत्यादींचा समावेश या भेटवस्तूंमध्ये होता. शाळेतील प्रत्येक वर्गाला त्यांनी भेट दिली आणि मुलांशी थेट संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी, सॅनिटायझेशन, हात धुण्याची पद्धत, आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. हा थेट संवाद विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.
विशेष म्हणजे पाहुण्यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ देखील आणले होते. मुलांच्या चेहऱ्यावर त्या क्षणी उमटलेले हास्य हे त्या सर्व स्नेहदायी भेटीचे प्रतीक होते. केवळ खाऊच नव्हे, तर सांस्कृतिक कार्यक्रमात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वैयक्तिकरित्या कौतुक करून सुमारे ५,००० रुपये रोख रकमेची बक्षीसेही त्यांना प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांची नावे पुकारून दिलेली ही बक्षीसे त्यांच्यासाठी केवळ बक्षीस नव्हे, तर आयुष्यातील प्रेरणादायी क्षण ठरली. या समारंभाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड सर यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी शाळेची वाटचाल, विविध उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची प्रगती, शिक्षकांची तळमळ आणि समाजाशी असलेली नाळ याविषयी मोजक्या पण प्रभावी शब्दांत माहिती दिली. त्यांचे भाषण समारंभाच्या सुरुवातीलाच उपस्थितांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे ठरले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन अत्यंत सुबकपणे आणि काटेकोर नियोजनात पार पडले. शिक्षकांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या, विद्यार्थ्यांना वेळेत मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सराव वेळेवर घेतले, सगळीकडे व्यवस्था आणि शिस्त राखली. शाळेच्या संपुर्ण टीमवर्कचे हे एक उत्कृष्ट उदाहरण होते.कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी जीएसके कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर श्री. सुहास बनकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये असलेला आत्मविश्वास, शिक्षकांचा समर्पित दृष्टिकोन, आणि ग्रामीण भागातील शिक्षणाची ही उंच भरारी पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. यापुढेही आमच्या कंपनीमार्फत शाळेस आवश्यक ती मदत, सहकार्य आणि पाठबळ वेळोवेळी दिले जाईल,” असे ठाम आश्वासन त्यांनी दिले.
हा संपूर्ण दिवस शाळेसाठी केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर एक प्रेरणा, एक अनुभव, आणि भविष्यातील विश्वासाचे बीज रोवणारी भेट ठरली. गावातील शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून, सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांची पेरणी करणारी पवित्र भूमी असते, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणून मातोरीची जिल्हा परिषद शाळा या दिवशी सर्वांसमोर उभी राहिली.


























