उल्हासनगर दि.२७ ( प्रमोद दळवी ) : पावसाळा सुरू होताच उल्हासनगर शहरातील कॅम्प नं- ५ परिसरातील विविध भागात राहणाऱ्या ८ जणांना एकाच दिवशी सर्पदश झाल्याने त्यांना उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सर्वांचे तत्पर उपचार केल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. डॉक्टरांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात एकाच दिवशी सर्पदंश केलेले ८ रुग्ण दाखल असून त्यापैकी तीन महिला तीन पुरुष व दोन लहान मुलांचा समावेश आहे. या सगळ्यांवर तातडीने उपचार करण्यात आले. याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली या रुग्णांना गोल्डन पिरेडमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे. या रुग्णांना चावलेल्या सापांमध्ये विषारी , बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांचा समावेश आहे . सध्या सर्व रुग्णांची प्रकृती उत्तम आहे .सर्पदंश झाल्यानंतर त्वरित रुग्णालयात दाखल करावे असे आवाहन करण्यात आले.

पावसाळ्यात सापांच्या बिळामध्ये पाणी शिरत असल्याने साफ सुरक्षा जागेच्या शोधात बाहेर पडतात. त्यामुळे या काळात सर्पदंश घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. नागरिकांनी पावसाळ्यात विशेष खबरदारी घ्यावी साप चावल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता जवळच्या रुग्णालयात तातडीने जावे असे आवाहन करण्यात आले आहे. :सर्पदंश झालेले ८ रुग्ण उल्हासनगरातील कॅम्प नं- ५ परिसरातील राहणारे असल्याची माहिती उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली





























