उल्हासनगर दि.०४ : शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आता नागरिकांना पालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत. कारण आता उल्हासनगर महापालिकेची ऑनलाईन प्रणाली सुरू झाली असून घरबसल्या नागरिकांना विविध समस्यांच्या तक्रारी आता नोंदविता येणार आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचे ढिगारे तसेच रोजच्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आता महापालिकेने ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित केली आहे.
शहरातील नागरिकांना महापालिकेला कर अदा करूनही रोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूककोंडी, फुटलेली जलवाहिनी, विविध भागात कचऱ्यांचे ढिगारे साठल्याचे चित्र असते. त्याविषयी तक्रारी करण्यासाठी महापालिकेत फेऱ्या माराव्या लागतात. या दैनंदिन अडचणींचे वेगाने निवारण आणि पारदर्शक कारभारासाठी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे रहिवाशांना घरबसल्या संबंधित विभागाकडे तक्रार करता येणार आहे. त्यानंतर ठराविक कालमर्यादेत समस्येवर कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या ऑनलाइन प्रणालीवर नागरिकांना उल्हासनगर महापालिकेच्या ‘तक्रार निवारण पोर्टल’ https://grievances. smartumc.info वर लॉग-इन करावे. तक्रार नोंदवल्यानंतर ती तत्काळ संबंधित विभागाकडे पाठवली जाईल. निवारणाची प्रक्रिया पारदर्शक राहील आणि ठराविक कालमर्यादेत पूर्ण केली जाईल.तक्रार नोंदणी व निवारण प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी https://umc.gov.in या संकेतस्थळावर माहितीपट उपलब्ध आहे.





























