- प्रभागातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती व पाईपलाईन टाकण्याच्या कामांची केली पाहणी
उल्हासनगर दि २४ : मंगळवारी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से) यांनी उल्हासनगर महानगरपालिकाच्या वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत सेंट्रल व्हॅक्सिन स्टोअर तसेच नगरी आरोग्य केंद्र क्र. ५ (VTC ग्राऊंड) येथे भेट देऊन केंद्रातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी लसीकरणाची प्रक्रिया, औषधसाठा, उपलब्ध सुविधा व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची सविस्तर पाहणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत नागरिकांना वेळेत व सुयोग्य सेवा देण्याबाबत निर्देशित करण्यात आले..

शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे यांनी शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक अरुण अशान , नगरसेविका इंदिरा निखिल पाटील, सौ काजल जग्याशी ,अमर जग्याशी यांच्या समवेत प्रभाग क्रमांक १५ मधील विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती व पाईपलाईन टाकण्याच्या कामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. कामांची गुणवत्ता, प्रगती तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. काही प्रलंबित बाबींविषयी संबंधित विभागप्रमुखांना त्वरित दूरध्वनी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.सदर पाहणीवेळी उपआयुक्त अनंत जावदवार, वैद्यकीय विभागाच्या अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा तसेच मोठ्या संख्येने नागरिकही यावेळी उपस्थित होते.





























