उल्हासनगर दि.८ ( प्रमोद दळवी ) : शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी मनसेने वारंवार महापालिकेकडे केली होती. याशिवाय पालिका प्रशासनाला जाग येते म्हणून आंदोलन देखील केले होते. अखेर मनसेच्या पाठपरवाला यश आले असून शहरातील फॉरवर्ड लाईन ते नेहरू चौक या रस्त्यांच्या डांबरीकरणाला पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.

शहरातील रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यामय रस्त्यामुळे अनेक अपघाताच्या घटना ही घडत आहेत. पालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाला (सार्वजनिक बांधकाम विभागाला) वारंवार निवेदनही देऊन त्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नव्हते. मनसेने आंदोलनही केले होते. तरीदेखील पालिका प्रशासनाला जाग आली नव्हती.
अखेर मनसेने आक्रमक भूमिका घेत निवेदनाच्या माध्यमातून दोन दिवसात पालिका प्रशासनाने फॉरवर्ड लाईन ते नेहरू चौक रस्त्याच्या कामाला सुरुवात केली नाही तर उल्हासनगर शहरातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी पुढच्या आंदोलन हे महापालिकेच्या कार्यालयात मनसेच्या पद्धतीने करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनाला जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी दिला होता. यावेळी उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश सेठपालांनी, रवी पाल, शैलेश पांडव, सागर चौहान, अनिल जाधव यांच्या सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अखेर पालिकेने फॉरवर्ड लाईन ते नेहरू चौक रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात केल्याने मनसेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.





























