अंबरनाथ दि.१७ (प्रमोद दळवी ) : अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक दोन दिवसावर आली असताना भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.
बुधवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास पवन वाळेकर हे अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडीपाडा येथे आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह बसले होते. त्याचवेळी दुचाकी घेऊन आलेल्या दोन इसमाने पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने चार राऊंड फायर केले. या चार गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून गोळीबार नंतर हे इसम तिथून पळून गेलेत. धमकवण्याच्या दृष्टीने हा गोळीबार केला असल्याचा पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने निवडणुकीला पुन्हा एकदा गालबोट लागले आहे
या बाबत परिमंडळ -४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीत शंकर मंदिर परिसरात भूपती वेंचर्स या कार्यालयाच्या समोर गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दोन आज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये तीन पोलिसांचे पथक तपासाकामी कार्यरत करण्यात आले आहेत. शिवाय गुन्हे शाखा ठाणे यांचा एक सेपरेट पथक यामध्ये कार्यरत आहे. यामध्ये दोन अज्ञात हल्लेखोराने येऊन कार्यालयावर बेछूट गोळीबार केल्याची घटना आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून ही घटना नक्की कोणत्या कारणावरून घडली आहे. यामध्ये अज्ञात हल्लेखोर यांच्यापर्यंत पोहोचून या घटनेविषयी सविस्तर खुलासा आम्ही लवकरच करू. या घटनेत कार्यालयावर एकूण चार राऊंड फायर झाले आहेत. एकंदरीत सीसीटीव्हीच्या व्हिडिओमध्ये जे दोन हल्लेखोर आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतरच त्यांचा नक्की काय उद्देश होता हे स्पष्ट कारण नंतर सांगता येईल. असे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले
.




























