अंबरनाथ दि.१३ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ पूर्व येथील शिवगंगा परिसरातील प्रिसियेस गॅलेक्सी मध्ये सोमवारी एक अनोखी घटना घडली. येथील रहिवासी दिनेश अश्वानी यांच्या चारचाकी वाहनाच्या बोनटमध्ये सुमारे ५ फूट लांबीचा धामण प्रजातीचा बिनविषारी साप शिरल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली.
दिनेश अश्वानी यांनी तत्काळ सर्पमित्र आकाश गोहिल यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळाल्यानंतर आकाश गोहिल घटनास्थळी दाखल झाले. वाहनाच्या बोनटमध्ये खोलवर लपलेल्या सापाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी अत्यंत संयमाने आणि काळजीपूर्वक सुमारे दोन तास प्रयत्न केले. अखेर धामण प्रजातीच्या बिनविषारी सापाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यात सर्पमित्र आकाश गोहिल यांना यश आले. त्यानंतर वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करत सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
सर्पमित्र आकाश गोहिल यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, सध्या पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने आणि उष्णतेत वाढ झाल्यामुळे साप थंड व सुरक्षित जागेच्या शोधात वाहनांचे बोनट, घरांचे परिसर, बागा तसेच इतर सावलीच्या ठिकाणी आश्रय घेत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत घाबरून न जाता किंवा सापाला इजा करण्याचा प्रयत्न न करता तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्र किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा.





























