उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच राष्ट्रीय ध्वजाबद्दल अभिमान व जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) सकाळी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालय येथून रॅलीला सुरुवात झाली. महापौर सौ. अश्विनी कमलेश निकम यांनी स्वतः बाईक चालवत रॅलीत सहभाग घेतला. सभागृहनेते अरुण आशान यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. रॅलीचा मार्ग उमपा मुख्यालय – १७ सेक्शन – श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक – नेहरू चौक – शिरू चौक – १ नंबर बस स्टॉप – शहाड स्टेशन असा होता. शहाड स्टेशन येथे पोहोचल्यानंतर रॅली पुन्हा उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयाकडे रवाना झाली. मुख्यालय येथे रॅलीचा उत्साहात समारोप करण्यात आला.

या रॅलीमध्ये महापौर सौ. अश्विनी कमलेश निकम, सभागृह नेते अरुण आशान, नगरसेवक जमनादास पुरुस्वानी, नगरसेवक दुर्गाप्रसाद राय, नगरसेविका सौ. कोमल ठाकूर, नगरसेविका सौ. इंदिरा निखिल पाटील, वृक्ष प्राधिकरण सदस्या श्रीमती कविता लासी, उपायुक्त (मुख्यालय) डॉ. श्रीमती दिपाली चौगुले, उपायुक्त (जनसंपर्क) श्रीमती स्नेहा करपे, मुख्य लेखा परीक्षक श्रीमती सुषमा पाटील, मुख्य लेखा अधिकारी श्रीमती नितल लव्हाळे, जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी, क्रीडा अधिकारी अजित गोवारी, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, लिपिक शांताराम चौधरी यांच्यासह लेखा विभागातील अधिकारी, सिंधू एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालयीन शिक्षक, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक विभागातील कर्मचाऱ्यांनी रॅलीच्या आयोजनात महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. दरम्यान, ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवावा आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्सव देशभक्तीच्या भावनेने साजरा करावा असे आवाहन महापौर सौ. अश्विनी कमलेश निकम, सभागृह नेते अरुण आशान तसेच वरिष्ठ नगरसेवक जमनादास पुरुस्वानी यांनी केले.‘हर घर तिरंगा’ अभियान हे केवळ ध्वज फडकविण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याबद्दल आदराची भावना अधिक दृढ करणारे अभियान ठरावे, असा संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. या संदर्भातील माहिती उल्हासनगर महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.





























