उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ येथील कान, नाक व घसा (ENT) विभागाच्या वतीने मध्यवर्ती रुग्णालयात पहिली एंडोस्कोपिक सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे उल्हासनगरकरांना आधुनिक आणि तज्ज्ञ वैद्यकीय उपचारांची सुविधा आपल्या शहरातच उपलब्ध होण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया ENT विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विजय पवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य केली. या यशामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथचे डीन डॉ. संतोष वर्मा, मध्यवर्ती रुग्णालयाचे सीएस डॉ. बानसोडे, भूलतज्ज्ञ विभागाच्या HOD डॉ. वैशाली मॅडम, डॉ. निलेश, डॉ. भावना तसेच संपूर्ण ऑपरेशन थिएटर (OT) स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण वैद्यकीय टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
मध्यवर्ती रुग्णालयात अशा प्रकारची अत्याधुनिक शस्त्रक्रिया सेवा सुरू होणे हे केवळ रुग्णालयासाठीच नव्हे, तर संपूर्ण उल्हासनगर शहरासाठी महत्त्वाचे मानले जात आहे. यापुढे नागरिकांना काही आधुनिक उपचारांसाठी इतर मोठ्या शहरांतील रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार पप्पू कालानी, आरोग्य सभापती सौ. सविता तोरणे रगडे आणि समाजसेवक शिवाजी रगडे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे, सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ आणि मध्यवर्ती रुग्णालय यांच्यात प्रभावी समन्वय घडवून आणल्यामुळे ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया सेवा नागरिकांसाठी उपलब्ध होऊ शकली असल्याचे सांगण्यात आले.
उल्हासनगरकरांना आधुनिक, दर्जेदार आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आपल्या शहरातच उपलब्ध करून देणे, या उद्दिष्टाच्या दिशेने मध्यवर्ती रुग्णालयात झालेली ही पहिली एंडोस्कोपिक सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रिया एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे. आगामी काळातही मध्यवर्ती रुग्णालयात विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या यशामुळे मध्यवर्ती रुग्णालयाच्या आरोग्यसेवेला अधिक बळकटी मिळाली असून, शहरातील नागरिकांसाठी ही निश्चितच दिलासादायक आणि अभिमानाची बाब ठरली आहे.





























