उल्हासनगर दि .२५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील कॅम्प नंबर – ४ परिसरातील आर.जी.एस शाळेजवळील भाजी मार्केट येथील मनीष जनरल स्टोअर या दुकानाला रविवारी सकाळी ७.३० च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की त्या परिसरात नागरिकांमध्ये एकच पळापळीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला मिळतात त्यांनी त्वरित त्या ठिकाणी धाव घेतली
हे दुकान इमारतीखाली असल्यामुळे लागलेल्या या आगेमुळे इमारती धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याशिवाय या आगीमुळे धुराचे साम्राज्य त्या ठिकाणी पसरले होते. ज्या ठिकाणी आग लागली होती ते आगीचे ठिकाण आड वाटायला असल्याने व गाडी जाण्यासाठी जागाही खूप कमी असल्यामुळे अग्निशमन दलाला खूप मेहनत करून ती आग विझवण्यात आली. जनरल स्टोअर मध्ये लागलेल्या आगीमुळे दुकानातील फर्निचरसह, फ्रिज व पूर्ण सामान जळून खाक झाले. लागलेल्या या आगीमुळे दुकानदाराचे मोठे नुकसान झाले असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.





























