उल्हासनगर दि.१५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४ परिसरात ग्राहकांना एचपी गॅस वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. याशिवाय गॅस एजन्सीकडे डिलिव्हरी बॉय नसल्याने व स्टॉकचाही तुटवडा असल्याने ग्राहकांना कामाला दांड्या मारून चक्क गॅस एजन्सीच्या कार्यालयात तासून तास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने एचपी गॅसच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

उल्हासनगरतील कॅम्प नंबर -४ परिसरातील विनेस टॉकीज जवळ एचपी गॅसचे कार्यालय आहे. मोबाईल द्वारे गॅस बुकिंग केल्यावर गॅस सिलेंडर वितरण करण्यासाठी येणाऱ्या डिलिव्हरी बॉयला तो ओटीपी दिल्यावर ग्राहकांना गॅस सिलेंडर दिले जातात. पण तब्बल १५ ते २० दिवसाआधी गॅस बुकिंग करूनही ग्राहकांना गॅस सिलेंडर वितरण केले जात नाही. गॅस बुक केल्यावर स्वतः ग्राहकाला गॅसचे पासबुक व ओटीपी घेऊन एचपी गॅसच्या कार्यालयात जावे लागते. त्यानंतर त्याला कार्यालयातून एक पावती देऊन ती उल्हासनगरातील कॅम्प नंबर -५ येतील समतानगर येथे असणाऱ्या एचपी गॅसच्या गोडाऊन मध्ये जाण्यास सांगतात. पण त्या ठिकाणी गोडाऊन मध्ये पोहोचल्यावर तिथे देखील गॅसचे स्टॉक नाहीये असे सांगण्यात येते. त्यामुळे ग्राहकांना नाहक पायपीट करावी लागते. एचपी गॅस एजन्सीकडे यापूर्वी ग्राहकांना गॅस सिलेंडर देण्यासाठी डिलिव्हरी बॉय होते. पण काही कारणास्तव त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बरेच दिवस झाले एचपी गॅस वितरण करणारे डिलिव्हरी बॉय नसल्यामुळे ग्राहकांचे हाल होत आहेत. स्वतः ग्राहकांना एखाद्या वाहनावरून गॅस सिलेंडरची टाकी घेऊन यावी लागत आहे. कॅम्प नंबर -४ परिसरातील एचपी गॅस कार्यालयाच्या या अनागोंदी कारभारामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नेहमीच कार्यालयाबाहेर स्टॉक नाही आहे डिलिव्हरी बंद आहे असे लिहून ठेवण्यात येत असते. शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्या कडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. कॅम्प नंबर -४ परिसरातील एचपी गॅसच्या कार्यालयाची सखोल चौकशी करण्यात यावी. त्या ठिकाणी गॅसचा काळाबाजार होत असल्याची ओरड नागरिकांमध्ये केली जात आहे. ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत एचपी गॅस च्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही





























