उल्हासनगर दि.८ ( प्रमोद दळवी ) : नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी मलनिसरण विभागामार्फत महाराष्ट्र प्राधिकरण यांच्या मोकळ्या भूखंडावर ठेवण्यात आलेले पाईप त्या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत दिसून आल्याने उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे. या पाईपांना आग नेमकी कशामुळे लागली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कोणीतरी जाणून-बुजून या पायपांना आग लावली असावी असे देखील बोलले जात आहे.
उल्हासनगरातील कॅम्प नं- ५ येथील कुर्ला कॅम्प, शिव मंदिर रोड येथील महाराष्ट्र प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर मलनिस्सारण विभागामार्फत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी आवश्यक असलेले मोठ्या आकाराचे पाईप संबंधित भूखंडावर साठवून ठेवण्यात आले होते. मात्र, आज सकाळी या ठिकाणी पाहणी केली असता संबंधित पाईप पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती नियाझ अन्सारी आणि ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सिटी प्रोजेक्ट ऑफिसर पंकज जाधव यांना दूरध्वनीद्वारे दिली.

या घटनेमुळे सरकारी कामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाईपांना आग नेमकी कशी लागली, ही दुर्घटना होती की कोणीतरी जाणून-बुजून हा प्रकार केला आहे का याचा तपास होणे आवश्यक असल्याची मागणी सर्वत्र केली जात आहे. जळालेले मोठे पाईप हे डीडब्ल्यूसीचे होते.दोन किलोमीटर पर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी त्या ठिकाणी आणून ठेवण्यात आले होते., सरकारी निधीतून खरेदी करण्यात आलेल्या साहित्याची अशा प्रकारे झालेली हानी ही चिंतेची बाब असून संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.





























