– पूर्णाकृती पुतळ्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर
– खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
अंबरनाथ दि. २६ : अंबरनाथ शहरातील लाखो नागरिकांच्या भावना आणि अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर प्रत्यक्षात उतरू लागली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि स्मृतीला कायमस्वरूपी अभिवादन करणारे भव्य स्मारक आता अंबरनाथमध्ये उभारले जाणार आहे. अंबरनाथ (पश्चिम) येथील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाने ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेअंतर्गत तब्बल २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी मंजूर होण्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. तसेच अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी देखील यासाठी पाठपुरावा केला होता.
अंबरनाथ शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जपणारे, त्यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारे एक हक्काचे ठिकाण असावे, अशी मागणी शहरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, साहित्यप्रेमी आणि विविध चळवळीतील कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा विषय शासन स्तरावर प्रभावीपणे मांडला आणि त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
विशेष म्हणजे, धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. दिलेला शब्द पाळत त्यांनी या कामासाठी शासनाकडून निधी मंजूर करून घेतला असून, आता ते आश्वासन प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शिल्पकार होते. त्यांनी आपल्या साहित्य, लोकशाहिरी आणि विचारांच्या माध्यमातून शोषित, वंचित, कष्टकरी आणि सर्वसामान्य समाजाला आवाज दिला. त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावी, त्यांच्या विचारांचा वारसा जपला जावा आणि त्यांच्या स्मृतींना अंबरनाथमध्ये कायमस्वरूपी मानाचे स्थान मिळावे, या उद्देशाने हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार या प्रकल्पाची अंमलबजावणी अंबरनाथ नगरपरिषदेमार्फत करण्यात येणार असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला संपूर्ण २ कोटी रुपयांचा खर्च राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.या निर्णयामुळे अंबरनाथ शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवात आणखी एक मानाचा अध्याय जोडला जाणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करणारे हे स्मारक केवळ एक पुतळा न राहता सामाजिक समतेचा, परिवर्तनाचा आणि प्रेरणेचा संदेश देणारे ऐतिहासिक स्मृतिस्थळ ठरणार आहे.अंबरनाथकरांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या या पुढाकाराचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.





























