उल्हासनगर दि २७ : उल्हासनगर महापालिकेच्या सफाई कामगारांच्या समस्या समजून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्यासोबत आढावा बैठक घेत सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या संदर्भात चर्चा केली. त्यावेळी आयुक्त यांनी बहुतांश मागण्या मान्य करत रिक्त असलेले ५६ सफाई कामगारांचे पदे तीन महिन्यात भरण्याची आश्वासन डागोर यांना दिले
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष डागोर यांनी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी शासनाने दिलेल्या सुविधा कर्मचाऱ्यांना मिळतात की नाही हे पाहण्यासाठी यांनी शुक्रवारी उल्हासनगर महापालिका दौरा केला. या बैठकीत उपस्थित असलेले सफाई कामगार नेते आयुक्त आयुक्त मनिषा आव्हाळे व अन्य अधिकारी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली.ज्या सफाई कामगारांची २५ वर्षे सेवा झाली, त्यांना श्रमसाफल्य योजने अंतर्गत मोफत घर देण्याचे महापालिकेने मान्य केले. तसेच सफाई कामगार ज्या महापालिका निवासात राहतात. त्यांचे भाडे कमी करणे, लाड-पागे समितीची अंमलबजावणी करणे, आरोग्यासाठी कॅशलेस १० लाखाचे कार्ड देणे, शासनाचे सार्वजनिक सुट्टी व साप्ताहिक सुट्टी लागू करणे, दिव्यांग कामगारांना त्यांच्या दिव्यांगाच्या प्रमाणात काम देणे, शिक्षित सफाई कामगारांना पदोन्नती देणे आदी आयोगाच्या मागण्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मान्य केल्या.
महापालिकासह सर्वच ठिकाणी कंत्राटी कामगार पद्धती लागू झाली. शासन नियमानुसार किमान वेतनावर सफाई कामगारांसह अन्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर महापालिका घेत आहे. सफाई कामगार पुरविण्यासाठी महापालिकेच्या एखाद्या सफाई कामगारांलाच ठेका मिळावा. असेही आयोगाचे अध्यक्ष डागोर म्हणाले. पुन्हा तीन महिन्यानंतर या संदर्भात आढावा घेण्यासाठी महापालिकेत येणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले. यावेळी आयुक्त मनिषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, कामगार नेते चरणसिंग टाक, राजेंद्र अंडागळे आदि जण उपस्थित होते.





























