उल्हासनगर दि २७ ( प्रमोद दळवी ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांना त्यांच्या क्षेत्रातून वालधुनी नदीत सोडले जाणारे प्रदूषित पाणी तात्काळ थांबविण्याच्या सूचना निवेदन पत्राद्वारे देण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागामार्फत काही संबंधित संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच ठाणे जिल्हयातील बदलापुर, अंबरनाथ, उल्हासनगर व विठ्ठलवाडी या शहरातुन वाहना-या वालधुनी नदीच्या प्रदुषणाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी, घनकचरा, प्लास्टिक कचरा व इतर प्रदूषक पदार्थांचा विसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित जलस्रोताचे प्रदूषण होत असून पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य व जैवविविधतेस गंभीर धोका निर्माण झाला आहे.
वालधुनी नदीचे प्रदूषण रोखणे या पर्यावरणीय दायित्वाच्या संदर्भात महानगरपालिकेकडून कायदयांन्वये संवैधानिक जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे त्यात १) प्रदूषण करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा आस्थापनास नोटीस बजावणे.२) अनधिकृत सांडपाणी जोडणी तोडणे ३) स्थानिक उपविधींनुसार दंडात्मक कारवाई करणे.४) व्यापार परवाना निलंबित किंवा रद्द करणे, ५) नदी अथवा नाल्यालगतचे प्रदूषणकारी अतिक्रमण हटविणे, ६) घनकचरा व सांडपाणी नदीत जाण्यास प्रतिबंध करणे, ७) संबंधित प्रकरण Maharashtra Pollution Control Board कडे पुढील कारवाईसाठी पाठविणे, ८) जलनिःसारण व मलनिःसारण विभागाकडून सार्वजनिक गटारे, नाले व ड्रेनेज लाईन्सची नियमित स्वच्छता व दुरुस्ती करणे, अनधिकृत सांडपाणी जोडण्या (Illegal Sewer Connections) शोधून बंद करणे, मलजल (Sewage) नदीमध्ये सोडण्यास प्रतिबंध करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (STP) उभारणे, चालविणे व त्यांची कार्यक्षमता सुनिश्चित करणे, मालमत्ता धारकांना आवश्यकतेनुसार सार्वजनिक गटाराशी जोडणी करण्याचे आदेश देणे, नाले, गटारे किंवा जलनिस्सारण मार्गात अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण हटविणे आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या अस्वच्छ किंवा दूषित मलनिस्सारण व्यवस्थेबाबत नोटीस बजावणे व नोटीसचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करणे इ. कार्यवाही होणे आवश्यक आहे. असे असे सांगण्यात आले आहे. वालधुनी नदीचे संरक्षण करण्यासाठी नदीचे प्रदुषणाबाबत आपल्या अधिनस्त विभागांकडून प्रतिबंधात्मक, नियामक व दंडात्मक कारवाई करण्याचे नियोजन करण्यात यावे आणि नियोजन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अवलोकनार्थ इकडिल कार्यालयात पाठविण्यात यावा असे देखील पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.





























