उल्हासनगर दि १३ : उल्हासनगर महापालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ मे २०२५ रोजी मंगळवारी कॅन्सर तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १५८ लाभार्थ्यांनी तपासणी करून घेतली .

राज्य शासनाच्या कॅन्सर मोबाईल व्हॅनच्या साह्याने हे शिबिर मिड टाऊन रोटरी क्लब, गोल मैदान उल्हासनगर – २ येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत पार पडले. या शिबिराचे उद्घाटन उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उल्हासनगर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, उल्हासनगरातील सेंट्रल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ. मनोहर बनसोडे, शासकीय प्रसूतीगृहचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत दोडे, शासकीय प्रस्तुतिगृहचे बालरोग तज्ञ डॉ. यशवंत सदावर्ते, सेंट्रल हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. तृप्ती रोकडे, सेंट्रल हॉस्पिटलचे दंततज्ञ डॉ. जिनल रोकडे, शिबिर समन्वय डॉ. स्नेहल गुलाणे, उल्हासनगर महापालिकेचे सिटी प्रोग्राम मॅनेजर डॉ. विद्या चव्हाण, एन.सी.डी नोडल अधिकारी डॉ. वैशाली नाईक, मुख्यालय सार्वजनिक आरोग्य परिचारिका सौ पौर्णिमा खरात तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कार्यालयातील इतर कर्मचारी या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.

या शिबिरात स्तन, गर्भाशयमुख व तोंडाच्या कॅन्सरची तपासणी करण्यात आली. याशिवाय क्षयरोग ( TB ) व असंसर्गजन्य आजाराची (NCD) तपासणी देखील करण्यात आली. एकूण १५८ लाभार्थ्यांनी तपासणी करून घेतली असून २ संशयित रुग्णांच्या तोंडाच्या कॅन्सर साठी बायोप्सी घेण्यात आली आहे. या मोबाईल कॅन्सर तपासणी द्वारे १४ मे २०२५ रोजी महात्मा फुले नगर उल्हासनगर – ३, व १५ मे २०२५ रोजी ओ.टी सेक्शन उल्हासनगर – ४, १६ मे २०२५ रोजी नेताजी चौक उल्हासनगर -५ , या ठिकाणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 10 ते सायंकाळी ४ या वेळेत वेळेत होणार आहेत. उल्हासनगर महापालिका मार्फत सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी या शिबिरांना भेट द्यावी आणि कॅन्सर व इतर असंसर्गजन्य आजाराच्या मोफत तपासणीचा लाभ घ्यावा. उल्हासनगर महापालिका कॅन्सरसारख्या गंभीर आजारांची लवकर निदान व उपचार करण्यासाठी आणि जनजागृती साठी कटिबद्ध आहे. आरोग्य विभागाच्या एकात्रीत प्रयत्नांनी व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने मंगळवारी आयोजित केलेल्या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.






























