उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ) : रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागांतर्गत उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या वतीने आज, स्वातंत्र्य दिनानिमित्त, रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार कुमार आयलानी होते. यावेळी उल्हासनगर वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रस्ता सुरक्षेचा संदेश समाजाच्या विविध स्तरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पत्रकारांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा अभिनव उपक्रम यावेळी राबविण्यात आला. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा नियमित वापर करावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने उपस्थित पत्रकार बांधवांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर बाब नसून प्रत्येकाच्या जीवनाच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. अपघाताच्या वेळी हेल्मेटमुळे डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी दुचाकी चालविताना नेहमी दर्जेदार हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

वाहतूक नियमांचे पालन करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, सिग्नलचे पालन करणे आणि दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे या बाबींविषयी नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती होणे आवश्यक आहे. या जनजागृतीमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. पत्रकार बांधवांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माध्यमांच्या माध्यमातून वाहतूक सुरक्षेचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, “हेल्मेट वापरा, सुरक्षित प्रवास करा आणि अपघात टाळा” हा संदेश या रस्ता सुरक्षा अभियानातून देण्यात आला. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले. रस्ता सुरक्षा ही केवळ पोलिसांची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिक, पोलीस, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास अपघातांचे प्रमाण कमी करण्यास तसेच सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यास निश्चितच मदत होईल.





























