- पाण्यात बुडत असणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी दोघांनीही गमावले प्राण
माथेरान दि १६ ( प्रमोद दळवी ) : माथेरान मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. माथेरान मध्ये पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या नवी मुंबईतील तिघांचा माथेरान मधील शार्लेट लेकच्या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई मधील कोपरखैरणे परिसरातील एका महाविद्यालयामधील काही विद्यार्थी माथेरान मध्ये पावसाळी पर्यटनासाठी आले होते. त्यातील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रविवारी सायंकाळी माथेरान मधील शार्लेट लेकच्या ठिकाणी हे तरुण मंडळी मोजमजा करीत होते. त्यावेळी यातील एका तरुणाचा पाय घसरला. त्यावेळी दोघांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र तिघेही खोल पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. माथेरान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी साडेचार च्या सुमारास नवी मुंबई मधील कोपरखैरणे परिसरातील एका कॉलेजचे दहा विद्यार्थी पर्यटनाकरिता माथेरान मध्ये आले होते. शार्लेट लेक येथे लेक पॉइंट फिरत असताना त्यापैकी एक जण पाण्याजवळ पाय धुण्यासाठी गेला. पण त्याचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. तो बुडत असताना इतरांनी साखळी करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. ते प्रयत्न करत असताना त्यापैकी आणखीन दोन जण पाण्यामध्ये गेले. त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले व इतर वाचले. ज्यावेळी ते तिघेही पाण्यात बुडाले तेव्हा या घटनेची खबर त्या विद्यार्थ्यांनी माथेरान पोलिसांना दिली. माथेरान पोलिसांनी माथेरान सह्याद्री आपत्कालीन रेस्क्यू टीमला मदती साठी बोलावलं त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तिघांची शोध मोहीम सुरू होती. त्यानंतर त्या तिघांचेही मृतदेह त्यांच्या हाती लागले. या दुर्घटनेमुळे माथेरानमध्ये एकच शोककळा पसरली आहे. पाण्यात बुडून मृत्यू झालेले ते तिघेही महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.





























