- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची नाशिक दौऱ्यात माहिती
- जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांचा घेतला आढावा
- ३० जूनपूर्वी २८८ मतदार संघात बीएलए नियुक्ती पूर्ण करणार
नाशिक दि. १८ : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात मतदार यादी पुनरीक्षणाच्या मोहीमेची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने राज्यभरात बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्तीवर भर दिला आहे. राज्यातील सर्वच्या सर्व २८८ मतदार संघात पक्षाकडून बीएलए नियुक्त केले जाणार असून आतापर्यंत १.२५ एजंट्सची नेमणूक झाल्याची माहिती शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. खासदार डॉ. शिंदे यांनी सोमवारी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि देवळाली या विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी माहिती दिली. या आढावा बैठकीला मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मनीषा कायंदे, आमदार सुहास कांदे, सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे, माजी खासदार उन्मेष पाटील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने राज्यभरात विधानसभानिहाय मतदार संघाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यापासून झाली. नाशिकमधील इगतपुरी आणि देवळाली मतदार संघाचा आढावा घेतला. या दोन्ही मतदार संघात गटनिहाय सुमारे अडीच तास चर्चा झाली. पक्षाची ताकद आणि संघटना, मतदार यादी पुनरीक्षणासाठी बूथ लेव्हल एजंट नियुक्त्या झाल्यात की नाहीत, याचा आढावा सर्व मंत्र्यांनी घेतला.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, राज्यातील १०० विधानसभा, २२ जिल्ह्यांमध्ये जेथे परिषदेच्या निवडणुका आहेत तिथं आपण स्वत: आणि पक्षाचे मंत्री दौरे करतील आणि उर्वरित १५६ मतदार संघ आणि जिल्ह्यांची जबाबदारी मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ३० जूनपासून घरभेटीचा कार्यक्रम सुरु होणार असून त्यापूर्वी सर्वच २८८ मतदार संघात ‘बीएलए’ नियुक्त होतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेनेकडून आतापर्यंत राज्यात १.२५ लाख ‘बीएलएल’चे नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी विधानसभा निवडणूक, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षाकडून आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे पक्षाला मोठं यश मिळाले, असे ते म्हणाले.

नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचा १०० पेक्षा कमी मतांनी निसटता पराभव झाला. मात्र जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत आहे. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानंतर राज्यभरात शिवसेना संपर्कप्रमुख फिल्डवर काम करत आहेत. लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकात शिवसेनेला चांगलं यश मिळालं. आता उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकात देखील शिवसेना ताकदीनं उतरेल असे ते म्हणाले.





























