उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी ): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर-५ येथे उभारण्यात येत असलेल्या बार्टी (BARTI) प्रशिक्षण केंद्राच्या सुरू असलेल्या बांधकामाची आज आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी ठाणे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांच्या समवेत प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली.

उल्हासनगर परिसरातील गुणवंत व महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच विविध कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि शैक्षणिक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या उज्ज्वल भविष्यास मोठी चालना मिळणार आहे. पाहणीदरम्यान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी बांधकामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत कामाचा दर्जा, सुरक्षितता आणि कामाची गती याबाबत संबंधित शासकीय अधिकारी व ठेकेदारांशी चर्चा केली. हे महत्त्वाकांक्षी काम निर्धारित मुदतीत आणि सर्वोच्च गुणवत्तेसह पूर्ण करण्यात यावे, तसेच कोणत्याही प्रकारची हलगर्जी सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

यावेळी आमदार डॉ. किणीकर यांनी सांगितले की, बार्टी प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर उल्हासनगर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठा आधार मिळेल. सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या यशाचा मार्ग अधिक सुकर होईल. युवा पिढीचे सक्षमीकरण आणि उल्हासनगरचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्रमुख ध्येय असून त्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी नमूद केले. या पाहणीवेळी उल्हासनगरचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना शहरप्रमुख सचिन कदम, माजी नगरसेविका समिधा कोरडे, राजू वाळंज, गणेश शिंदे, गणेश चौघुले, ज्ञानेश्वर करवंदे, अनिल कुंचे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.





























