उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी ) : पवित्र श्रावण मासातील पहिल्या श्रावणी सोमवारी अंबरनाथ येथील प्राचीन व ऐतिहासिक शिवमंदिरात भक्तिमय वातावरणात भगवान महादेवाची विधिवत पूजा-अभिषेक करण्यात आला. शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते महादेवाचा विधिवत अभिषेक करून धार्मिक विधी पार पाडण्यात आले.

श्रावण महिन्यातील सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. या पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या ऐतिहासिक शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. मंदिर परिसरात हर हर महादेवच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विधिवत अभिषेक व पूजाविधी झाल्यानंतर राजेंद्र चौधरी यांनी भगवान महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सर्व नागरिकांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती लाभावी, तसेच समाजात ऐक्य व बंधुभाव कायम राहावा, यासाठी महादेवाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी कैलास तेजी, उपशहर संघटक प्रकाश भंडारी, उपविभाग प्रमुख आदिनाथ कोरडे, ज्ञानेश्वर करवंदे, गणेश शिंदे, तसेच शाखाप्रमुख कुमार भोपी, गोविंद पारधे आणि निलेश शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्रावणी सोमवारनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम व दर्शनासाठी भाविकांची वर्दळ पाहायला मिळाली. भक्तिमय वातावरणात महादेवाचे दर्शन घेत भाविकांनी आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.





























