ठाणे दि. १ ( प्रमोद दळवी ) : ज्ञान गंगा एज्युकेशन ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.), ठाणे येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रथम वर्ष बी.एड. विद्यार्थी-शिक्षकांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थी-शिक्षकांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे तसेच निरोगी, जबाबदार आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा होता.

कार्यक्रमात विद्यार्थी-शिक्षक राम्या बालाजी, रेश्मा कोटियन, झुम्मा, विजयालक्ष्मी, फराह आणि योगेश कुमार यांनी प्रभावी निवेदनासह विषयाधारित पथनाट्य (स्किट) सादर केले. या सादरीकरणातून अमली पदार्थांच्या व्यसनाची कारणे, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय प्रभावीपणे मांडण्यात आले. तसेच “ड्रग्सला नकार, जीवनाला होकार” हा सामाजिक संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीविषयी आकर्षक पोस्टर्स व जनजागृतीपर माहितीफलक प्रदर्शित केले. उपस्थित विद्यार्थ्यांसाठी संवादात्मक उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी “व्यसनमुक्त जीवनाचा एक महत्त्वपूर्ण लाभ” या विषयावर आपले विचार लेखी स्वरूपात व्यक्त केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाली आणि व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प अधिक दृढ झाला.
कार्यक्रमाची सांगता ‘व्यसनमुक्त भारत’ शपथ घेऊन करण्यात आली. यावेळी प्रथम व द्वितीय वर्ष बी.एड. विद्यार्थी-शिक्षक, सर्व प्राध्यापक तसेच प्रभारी प्राचार्या सौ. सविता उपासनी यांनी व्यसनापासून दूर राहण्याची आणि समाजात जनजागृती करण्याची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमासाठी सहाय्यक प्राध्यापिका प्रा. प्रतिभा कांबळी यांनी विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच सहाय्यक प्राध्यापिका प्रा. सुरभी सोना, डॉ. कविता कांबळे आणि प्रभारी प्राचार्या सौ. सविता उपासनी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि प्रभावी ठरला. कार्यक्रमाला विद्यार्थी-शिक्षक व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.





























