उल्हासनगर दि. २३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबजण घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळच्या सुमारास उल्हासनगरातील कॅम्प नंबर -१ येथील शिवनेरी नगर परिसरात २६ वर्ष प्रवीण अशोक वर्मा या तरुणाची कुणीतरी अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. प्रवीण याचा मृतदेह रक्ताच्या थरोळात त्या ठिकाणी पडलेला होता. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचानामा करून प्रवीण याचा मृतदेह ताब्यात घेतला. प्रवीण याचा मृतदेह उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत परिमंडळ -४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित गुन्ह्याच्या तपासाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

प्रवीण याचा खून नेमकी कोणत्या कारणावरून झाला, पूर्व वैमनस्यतून कि काही अन्य काही कारण आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पोलीस पथक कार्यरत करण्यात आले आहे . दरम्यान या हत्यामागे नेमके काय कारण आहे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एकंदरीत जुन्या वाद विवादातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.





























