अंबरनाथ दि. २७ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील उल्हासनगर क्रमांक ४ व ५ परिसरातील महाराष्ट्र शासनाच्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या दालनात पार पडली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीचे अध्यक्षस्थान अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भूषविले.

बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या दि. १ जानेवारी २०११ पर्यंत अस्तित्वात असलेल्या निवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरणासंदर्भातील शासन निर्णयाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शासनाच्या धोरणानुसार पात्र नागरिकांना नियमितीकरणाचा लाभ मिळावा आणि प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने राबविण्यात यावी, यासाठी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी नियमितीकरणासाठी आवश्यक असलेली पात्रता, जागेच्या क्षेत्रफळाची मर्यादा, आकारण्यात येणारे शुल्क, अर्ज स्वीकारण्याची व पडताळणीची प्रक्रिया, जागा मोजणीची कार्यपद्धती, अर्जाचे नमुने उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता या सर्व बाबींवर संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

या बैठकीस शिवसेना शहरप्रमुख सचिन कदम, नगरसेवक प्रदीप गोडसे, सुरज सोनकांबळे, विभागप्रमुख अनिल मराठे, आदिनाथ कोरडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता सोनू पवार, युवासेना शहराध्यक्ष सुशील पवार, शिवसेनेचे ज्ञानेश्वर करवंदे, सुधीर कन्हेरे, कारभारी गोडसे, युवासेनेचे राहुल जाजवट, वैभव कुलकर्णी, उल्हासनगर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सौ. अलका पवार, नगर भूमापन अधिकारी भोला शंकर कोकणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर प्रशासनाने स्पष्ट केले की, उल्हासनगर ४ व ५ परिसरातील पात्र नागरिकांना त्यांच्या घरांचे नियमितीकरण शासनाच्या धोरणानुसार सुलभ, पारदर्शक आणि नियमानुसार पूर्ण करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.





























