ठाणे दि.१३ : ठाणे शहरातील मैदानांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शने आणि पार्किंग सुरू आहेत. त्यामुळेच मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाही. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिका मुख्यालयात क्रिकेटचा डाव मांडला.
ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात गावदेवी हे मैदान आहे. हे मैदान खेळासाठी आरक्षित असूनही तिथे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. मागील वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत १७४ दिवस व यंदा ७० दिवस हे मैदान खासगी संस्थांना ठाणे पालिकेने दिले आहे. निधी मिळविण्यासाठी पालिकेने हे मैदान भाड्याने दिले आहे. त्यामुळे आम्ही पैसे देतो, आम्हाला खेळायला मैदान द्या, असे म्हणत संगम डोंगरे यांनी हे अनोखे आंदोलन केले. डोंगरे यांनी मुलांच्या पिगी बँक घेऊन पालिकेत प्रवेश करीत आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेट न झाल्याने त्यांनी पालिका मुख्यालयात बाहेरच पिगी बँक फोडून तसेच पैसे टाकून व क्रिकेट खेळत निषेध नोंदविला.





























