उल्हासनगर दि. ३१ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील प्रभाग (पॅनल) क्रमांक १५ मधील विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी महापौर अश्विनी निकम यांनी दौरा केला. यावेळी पेट्रोल पंप ते मानेरे गाव एसएसटी कॉलेज परिसरात नव्याने बसविण्यात आलेल्या पथदिव्यांचे उद्घाटन करून ते कार्यान्वित करण्यात आले. तसेच परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि विशेषतः ३० सेक्शनमधील रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करून नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार असल्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

या दौऱ्यादरम्यान शिवसेना गटाचे सभागृह नेते तथा नगरसेवक अरुण आशान, नगरसेविका काजल जग्याशी, संगीता सपकाळे आणि इंदिरा पाटील उपस्थित होते. चारही नगरसेवकांनी महापौरांकडे ३० सेक्शनमधील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापौरांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन रस्त्याची पाहणी केली. यावेळी नगरसेवक अरुण आशान यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक १५ मधील अनेक विकासकामे अद्याप अपूर्ण आहेत. या सर्व कामांची सविस्तर यादी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे यापूर्वीच सादर करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापौरांनी आज या भागाचा दौरा करून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. “महापौरांच्या या पाहणीनंतर ३० सेक्शन रस्त्याच्या कामाला शंभर टक्के गती मिळेल आणि लवकरच काम सुरू होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापौर अश्विनी निकम यांनी सांगितले की, पॅनल क्रमांक १५ मधील नगरसेवक आणि सभागृह नेते अरुण आशान तसेच नगरसेविका संगीता सपकाळे, इंदिरा पाटील आणि काजल जग्याशी यांनी या भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असल्याची माहिती देत पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. महापौर म्हणाल्या, “सुरुवातीला रस्त्यावरील खड्डे मास्टिकद्वारे बुजविण्याचा विचार होता. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर लक्षात आले की, केवळ खड्डे बुजवून हा प्रश्न सुटणार नाही. रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे की संपूर्ण रस्त्याचे नव्याने बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात येतील आणि येत्या चार ते पाच दिवसांत या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.” असे आश्वासन दिले .





























