अंबरनाथ दि.२० ( प्रमोद दळवी ) : ठाणे जिल्हा (ग्रामीण) राष्ट्रवादी काँग्रेस आणि अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी अंबरनाथ (पूर्व) येथील मोतीराम पार्क, शहर मध्यवर्ती कार्यालय येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत मोफत महाआरोग्य शिबिर, अंगणवाडीतील बालविद्यार्थ्यांना टिफिन वाटप तसेच वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. या कार्यक्रमासाठी मा. डॉ. प्रमोद हिंदुराव (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) आणि मा. आमदार श्री. दौलत दरोडा (शहापूर विधानसभा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक सल्ला देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ठाणे जिल्हा (ग्रामीण) राष्ट्रवादी काँग्रेस व अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सभापती, नगरसेवक, माजी नगरसेवक, विविध सेलचे अध्यक्ष, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या उपक्रमाचे आयोजन किसनराव तारमळे, अध्यक्ष – ठाणे जिल्हा (ग्रामीण) राष्ट्रवादी काँग्रेस तथा सरचिटणीस – महाराष्ट्र प्रदेश आणि सदाशिव (काका) पाटील, शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अंबरनाथ तसेच उपनगराध्यक्ष व आरोग्य सभापती, अंबरनाथ नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवा, बालकल्याण आणि पर्यावरण संवर्धन या तीन महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे





























