उल्हासनगर, दि. १० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी कमलेश निकम, तसेच आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे ( भा.प्र.से ) यांनी शुक्रवारी नव्याने उभारण्यात आलेल्या ESIS रुग्णालयाला सदिच्छा भेट देत संपूर्ण रुग्णालयाची सविस्तर पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील विविध विभाग, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवांचा आढावा घेण्यात आला.

पाहणीदरम्यान मान्यवरांनी सर्वसाधारण वॉर्ड, प्रसूती (डिलिव्हरी) वॉर्ड, शस्त्रक्रिया विभाग (ऑपरेशन थिएटर), अपघात व आपत्कालीन विभाग, स्वयंपाकगृह तसेच इतर आवश्यक विभागांना भेट देऊन तेथील सुविधा प्रत्यक्ष पाहिल्या. रुग्णांना दर्जेदार व प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली.
यावेळी रुग्णालयात आवश्यकतेनुसार डॉक्टर, परिचारिका (नर्सेस) तसेच इतर कर्मचारी पुरेशा संख्येने उपलब्ध आहेत का, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच रुग्णालय परिसरातील स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय उपकरणे आणि इतर मूलभूत सुविधांचीही पाहणी करण्यात आली. या भेटीदरम्यान उल्हासनगर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ESIS रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, अधिसेविका, परिचारिका तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, विविध वैद्यकीय सेवा तसेच भविष्यातील नियोजनाची माहिती महापौर अश्विनी कमलेश निकम, तसेच आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे ( भा.प्र.से ) यांना सादर केली.

पाहणीनंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच ESIS रुग्णालय लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विशेषतः कामगार वर्गाबरोबरच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनाही या रुग्णालयामध्ये आधुनिक व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. नवीन ESIS रुग्णालयामुळे परिसरातील कामगार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच जनआरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतील. यामुळे उपचारासाठी होणारा वेळ, खर्च आणि गैरसोय कमी होऊन नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ व परिणामकारक आरोग्यसेवा मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





























