उल्हासनगर, दि. ९ ( प्रमोद दळवी ) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ अभियान सुरू करण्यात आले असून, या मोहिमेत उल्हासनगर शहरातील सर्व पात्र नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेने केले आहे.
महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या अभियानादरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन गणना फॉर्म (Enumeration Form – EF) उपलब्ध करून देणार आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह हा फॉर्म काळजीपूर्वक भरून निर्धारित कालावधीत संबंधित BLO यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांकडून गणना फॉर्म प्राप्त होतील, त्यांचाच समावेश मसुदा मतदार यादीमध्ये करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदार यादीतील अपात्र, मृत, स्थलांतरित किंवा दुबार नावे वगळून मतदार यादी अधिक विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सन २००२ नंतर प्रथमच इतक्या व्यापक स्वरूपात मतदार यादीची पडताळणी होत असल्याने प्रत्येक पात्र नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, कोणत्याही मतदाराचे नाव सुनावणीची संधी दिल्याशिवाय मतदार यादीतून वगळले जाणार नाही. तसेच नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक घोषणापत्र (Declaration Form) सादर करणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय तक्रारी व अपील दाखल करण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी अधिक माहितीसाठी मतदार मदत क्रमांक १९५० वर संपर्क साधावा किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आपल्या घरी भेट देताच त्यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देऊन विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिकेने सर्व नागरिकांना केले आहे.





























