उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी ) : मंगळवारी रात्रीपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४ परिसरात असणाऱ्या जिजामाता कॉलनी मध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने त्या परिसरात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो नागरिकांच्या घरात हे पाणी शिरल्याने त्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. या जलमय परिस्थितीला उल्हासनगर महानगरपालिका जबाबदार असून पालिका प्रशासना विरोधात नागरिकांनी संतप्त व्यक्त केला आहे.

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ४ परिसरात जिजामाता कॉलनी हे परिसर असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. त्या ठिकाणी जवळच मोठा नाला असून त्या नाल्याची योग्य पद्धतीने साफसफाई करण्यात न आल्याने मंगळवारी रात्रीपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे चोकअप झालेल्या नाल्यातील सांडपाणी हे थेट त्या परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले. मध्यरात्रीपासून त्या ठिकाणी अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची अर्धी घरे पाण्याखाली आले आहेत. याशिवाय जिजामाता कॉलनीतून गुडघ्यावर भरलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिकांना बाहेर पडावे लागले. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेक नागरिकांचे संसार उपयोगी वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत नागरिकांनी संतप्त व्यक्त करीत सांगितले जवळपास पाच सहा वर्षांपासून जिजामाता कॉलनी परिसरात पाणी साचत असते. या परिसरातील नाल्यांची योग्य पद्धतीने साफसफाई केली जात नसल्यामुळे नाल्याचा पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते. हि समस्या गेल्या अनेक वर्षापासून असून देखील या समस्या कडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे या पावसात देखील या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. या मुसळधार पावसात आमच्या घरात पाणी गेल्याने आम्ही उघड्यावर आलो आहे. आमच्या सर्वच वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आम्ही आता राहायचं कुठं हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. इतकेच काय तर मुलांच्या शाळेची दप्तर आणि पुस्तक देखील या पावसाच्या पाण्यात भिजून खराब झाले आहेत. कालपासून आम्ही कॉलनीच्या बाहेरच उभा राहून आमच्या घरात शिरलेले नाल्याचे पाणी पाहत आहे असे देखील काही नागरिकांनी सांगितले. अद्याप पर्यंत आमच्या घराचे झालेले नुकसान व त्या ठिकाणी झालेली पूर परिस्थिती पाहण्यासाठी महापालिकेचे प्रशासन अधिकारी या ठिकाणी आलेले नाही असे देखील नागरिकांनी सांगितले. यावरून उल्हासनगर महानगरपालिकेची नालेसफाई कशा पद्धतीने झाली आहे हे या जलमय परिस्थितीवरून दिसून येत आहे





























