उल्हासनगर दि ८ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ३ परिसरात शासकीय मध्यवर्ती रुग्णालय आहे. या रुग्णालयात विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या या मागणीसाठी हस्तक्षर अभियान शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. या अभियानाला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

उल्हासनगर – ३ येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालय हे सर्व आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असे चारशे खाटांचे सुपर स्पेश्यालिटी रुग्णालय मंजूर करणे, ग्रामीण भागातून रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी धर्मशाळेची ईमारत बांधणे, सदर रुग्णालय असलेल्या आरोग्यसंस्थेचे श्रेणीवर्धन करणे, सदर रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान उपलब्ध करून देणे संबंधी मागणी करण्यासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालय बाहेर हस्ताक्षर अभियान आयोजित करण्यात आले होते.ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील कॅम्प – ३ येथील या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, टोकावडे, गोवेली, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर या ग्रामीण भागातील तसेच कल्याण व उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण मोठया प्रमाणात रुग्णसेवेसाठी येत असतात. विशेषतः उल्हासनगर क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता येणाऱ्या रुग्णांना योग्यरीत्या आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात सर्व आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असणे आवश्यक आहे. या मागणीसाठी शुक्रवारी हस्ताक्षर अभियान आयोजित करण्यात आले,
इंडियन्स सोशल मुव्हमेंट, महामाया असंगठित कामगार संघटना, अपंग आधार सेवा संस्था, अंबेडकरी बटालियन, सोहम फाउंडेशन व इंटरनेशनल मानव अधिकार संघटना या अभियानात सामिल होत्या. सदर हस्ताक्षर अभियानात शेकडो रुग्णासमवेत मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरनी सुद्धा सहभाग घेतला.





























