ठाणे दि २५ : कासारवडावली पोलीस स्टेशन यांच्या वतीने ब्रह्मांड ठाणे येथील पोलीस चौकीमध्ये सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तसेच ब्रह्मांड परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक मोहल्ला कमिटीच्या धर्तीवर घेण्यात आली.
या बैठकीत “पोलीस आपल्या दारी” ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात आली. सामान्य नागरिकांना नेहमीच पोलीस स्टेशनपर्यंत जाणे शक्य होत नाही; परंतु पोलीसच जर नागरिकांच्या भेटीस आले, तर स्थानिक समस्या थेट पोलीसांसमोर मांडता येतात. यामुळे परिसरातील प्रश्नांना त्वरित मार्ग काढता येईल, असे प्रतिपादन API विशाल रुमणे, PSI चौधरी तसेच ASI पाटील यांनी केले. तसेच ब्रह्मांड परिसरातील नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित, सुखमय व समृद्ध होण्यास मदत होईल, असे मतही व्यक्त करण्यात आले.
चर्चेदरम्यान ब्रह्मांड येथील पोलीस चौकीची दुरुस्ती करणे किंवा नवीन पोलीस चौकी उभारणे तसेच पोलीस चौकीसमोर हायमास्ट लाईटचा खांब उभारणे यासंदर्भात मा. महेंद्र मडवी, मा. महेंद्र देशमुख, प्रा. अनिल आठवले, मा. चंद्रकांत माने, प्रा. खोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले मत मांडले. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेचे पोलीस प्रशासनाने स्वागत केले. नागरिक आणि पोलीस यांच्यात अशा प्रकारे नियमित संवाद व समन्वय राहणे हीच खरी सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे, अशी भावना या बैठकीतून व्यक्त झाली. भविष्यातही अशा बैठका घेऊन परस्पर सहकार्य वाढवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.





























