उल्हासनगर दि .२६ : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व सक्षम प्राधिकरणांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांचा विशेष कृती आराखडा’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमात उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी उल्लेखनिय कामगिरी करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत डिजिटल क्रांती आणि प्रशासकीय पारदर्शकतेवर दिलेल्या भरमुळे पालिकेचा हा गौरव करण्यात आला आहे.
राज्यातील प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि नागरिकांना शासकीय सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ही विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये प्रामुख्याने ई-ऑफिस प्रणाली, सुसज्ज संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सेवा, व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि प्रगत तंत्रज्ञानाचा (AI/GIS) वापर या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत हे बाह्य मूल्यमापन करण्यात आले होते. मा. प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या सक्षम नेतृत्व व नियोजनाखाली महापालिकेने ई-गव्हर्नन्सच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले.
सदर कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन नागरिक सेवा, तक्रार निवारण यंत्रणा, ई-ऑफिस प्रणाली, अंतर्गत प्रशासकीय कार्यप्रणाली सुलभीकरण, वेळबद्ध निर्णयप्रक्रिया तसेच माहिती व तंत्रज्ञानाधारित सेवा वितरण यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या आहेत.
ई-ऑफिसची अंमलबजावणी : पालिकेतील अंतर्गत कामकाजासाठी कागदविरहित (Paperless) ई-ऑफिस प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी केली.
- डिजिटल सेवा : मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर नागरी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या.
- तक्रार निवारण : व्हॉट्सॲप आणि डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यात यश मिळवले.
- पारदर्शकता : ‘आपले सरकार’ प्रणालीमध्ये अर्जांचा निपटारा विहित वेळेत केल्यामुळे पालिकेच्या गुणांकनात मोठी वाढ झाली.
- भविष्यातही शासनाच्या धोरणानुसार व ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून नागरिकांना अधिक पारदर्शक, सुलभ व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे महापालिका प्रशासक तथा आयुक्तांनी स्पष्ट केले.





























