- उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभारा
उल्हासागर दि १५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरांमधील बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने तब्बल ५० लोखंडी स्टॉल सुमारे एक कोटी २४ लाख १५ हजार ७५० रुपयाचे खरेदी केले आहेत. जवळपास बचत गटातील ५० लाडक्या बहिणींना अद्याप पर्यंत ते स्टॉल देण्यात न आल्याने त्या महिला रोजगाराच्या आशेवर असून धुळखात पडलेले ते स्टॉल आता गंजू लागले आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या या अजब कारभाराबाबत बचत गटातील महिला वर्गांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
उल्हासनगर मधील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, महापालिकेने तब्बल ५० लोखंडी स्टॉल खरेदी केले. ५० पात्र महिला बचत गटाला स्टॉलचे वाटप ६ महिन्यापुर्वी होणार होते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून स्टॉलचे वाटप न झाल्याने, ते गंजत चालले आहेत, आता भंगारात काढणार का? असा प्रश्न बचत गटाच्या महिलांना पडला आहे.
उल्हासनगर महापालिका महिला व बाल कल्याण विकास विभागाने महिला बचत गटांना आठ बाय आठ आकाराचे एकूण ५० लोखंडी स्टॉल देण्याचा निर्णय घेतला. एका स्टॉलची किंमत २ लाख ४८ हजार ३१५ असून ५० स्टॉल १ कोटी २४ लाख १५ हजार ७५० रुपयाला खरेदी केले आहेत. परंतु वाटपासाठी प्रमुख पाहुण्यांची तारीख मिळत नसल्याने वाटपाचा कार्यक्रम वारंवार पुढे ढकलण्याची वेळ विभागावर आली असल्याचे बोलले जात आहे. महिला बचत गटांना लोखंडी स्टॉलचे वाटप कागदोपत्री झाले आहे. स्टॉलचा प्रत्यक्षात ताबा देण्यात आला नाही. उल्हासनगर ३ रेल्वे स्टेशन जवळ ६ महिन्यापासुन ठेवलेल्या स्टॉलची दुरवस्था झाली आहे. पाऊस व सांडपाण्यामुळे स्टॉल गंजून चालले आहेत.





























