उल्हासनगर दि. २५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर – ४ परिसरातील प्रभाग क्रमांक १५ मधील गीता कॉलनी येथील रस्त्याची दुरवस्था झाली होती. स्थानिक नगरसेविका सौ. इंदिरा निखिल पाटील, सौ. काजल अमर जग्यासी व सौ. संगीता नितीन सपकाळे यांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार तसेच गटनेता व नगरसेवक अरुण आशान यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यामुळे त्या रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे.

या रस्त्याच्या महत्त्वपूर्ण विकासकामाचे उद्घाटन गटनेता व नगरसेवक अरुण लक्ष्मण आशान यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी नगरसेवक कु. मधुर उमेश म्हात्रे, समाजसेवक नितीन सपकाळे, निखील एल. पाटील, निलेश बोबडे, राजू सोनवणे, समाजसेविका सौ. सीमा सोनवणे तसेच शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा रस्ता केवळ सुविधा नसून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. विकासाच्या या वाटचालीत जनतेचा विश्वास आणि सहकार्य हाच आमचा सर्वात मोठा बळ आहे. प्रभाग क्र.१५ चा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प यापुढेही अशाच जोमाने पूर्ण केला जाईल असे गटनेता व नगरसेवक अरुण लक्ष्मण आशान यांनी सांगितले .





























