- गांजा विक्री पूर्णतः बंद झालीच पाहिजे शिवसेनेची मागणी
उल्हासनगर दि १८ ( प्रमोद दळवी ) : चार कोटी रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. गांजा तस्करी प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांना अटक केली असून अटक करण्यात आलेले हे ३ आरोपी विठ्ठलवाडी शास्त्रीनगर झोपडपट्टी परिसरातील रहिवासी आहेत . त्यामुळे विठ्ठलवाडी हा गांजा विक्रीचा मुख्य केंद्र असावा त्यामुळे या आरोपींचे गांजा विक्री करणाऱ्या नातेवाईकांवर देखील पोलिसांनी कारवाई करावी व ही गांजाची विक्री पूर्णपणे बंद करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने परिमंडळ – ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडे केली आहे.

पोलिसांनी नुकताच चार कोटी रुपयांचा गांजा हस्तगत करून त्या तस्करी प्रकरणी मस्के उर्फ शेख या महिलेसह दोन जणांना अटक केली होती. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा पोलिसांनी जप्त केल्याने व अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलवाडी येथील शास्त्रीनगर झोपडपट्टी परिसरात राहणारे आहेत . या आरोपींना अटक केल्यावर देखील त्या ठिकाणी राजरोसपणे गांजाची विक्री सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने करत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेतली. शिवसेनेचे पदाधिकारी व पॅनल क्रमांक १० मधील राहणारे नागरिकांनी एकत्र जमा होऊन पोलीस उपायुक्त यांची भेट घेत यांना अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी व आरोपींचे गांजा विक्री करणाऱ्या नातेवाईकांवर देखील कारवाई करावीअशी मागणी केली.

यापूर्वी देखील विठ्ठलवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची तक्रारी पोलिसांना केल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर योग्य कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आले होते. आणि आता चार कोटी रुपयांचा गांजा पोलिसांनी हस्तगत केल्याने व ते तिन्ही आरोपी विठ्ठलवाडी परिसरात राहणारे असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या तस्करी प्रकरणात आणखीन कोण कोण आरोपींचा सहभाग आहे त्यांचा देखील शोध घेऊन त्यांना अटक करावी. ही गांजा विक्री पूर्णतः बंद झालीच पाहिजे. विठ्ठलवाडी हा गांजा विक्रीचा केंद्रबिंदू असल्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून इतर आरोपींनाही अटक करावी या मागणीसाठी शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व पॅनल क्रमांक १० मधील नागरिकांनी पोलीस उपायुक्तांकडे मागणी केली. याशिवाय पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी देखील शिवसेनेच्या शिष्टमंडळांना आश्वासन देत आम्ही या घटनेचा सखोल तपास करू व फरार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना देखील अटक करू असे आश्वासन दिले. या घटनेचा पोलीस कसा तपास करीत आहेत याचा देखील माहिती घेण्यात येणार असल्याचे शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी सांगितले






























