उल्हासनगर दि.२३ ( प्रमोद दळवी ) : सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगरातील राधास्वामी सत्संग चौक परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली होती. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहने खड्ड्यांमध्ये आदळत होती. परिणामी अपघाताचा धोका वाढण्याबरोबरच वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत भर पावसात रस्त्यावर उतरून जीवघेणे खड्डे बुजविण्याचे काम केले.

उल्हासनगर शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांची निर्मिती केली जात असली, तरी काही महिन्यांतच अनेक रस्त्यांची दुरवस्था होत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, “रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे. राधास्वामी सत्संग चौक हा शहरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग असल्याने येथे पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत होता. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांसह इतर वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. तसेच वाहनांची गती मंदावल्यामुळे या चौकात वारंवार वाहतूक कोंडी होत होती.

ही परिस्थिती लक्षात येताच उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी कोणतीही प्रतीक्षा न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम सुरू केले. पोलिसांनी सर्वप्रथम खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी बाहेर काढले. त्यानंतर माती, डांबर मिश्रित खडी आणि इतर साहित्याचा वापर करून खड्डे बुजविण्यात आले. काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्यानेही दुरुस्तीचे काम करण्यात आले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही वाहतूक पोलिसांनी ही मोहीम राबवून वाहनचालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले.या तातडीच्या उपाययोजनेमुळे राधास्वामी सत्संग चौकातील वाहतूक पूर्ववत सुरळीत होण्यास मदत झाली असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भर पावसात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या या कार्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी उल्हासनगर वाहतूक पोलिसांचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले.





























