नाशिक दि. १७ ( संदीप गायकवाड ) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नाशिक येथील बुक ऑफ लाइफ चर्चच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला चर्च सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे मार्गदर्शन पास्टर डॉ. सुनील आणि पास्टर ग्लोरी यांनी केले. यावेळी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना त्यांनी, “आपले रक्तदान एखाद्याचे मौल्यवान जीवन वाचवू शकते. मानवतेची सेवा हीच खरी सेवा आहे,” असा प्रेरणादायी संदेश दिला. रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.शिबिरासाठी समता रक्त केंद्र, नाशिक यांच्या पथकाने विशेष सहकार्य केले. डॉ. इरफान खान, प्रो. मेनका ढिकले, सिस्टर श्रद्धा मसुरकर, टेक्निकल दीप्ती भिसेन, टेक्निकल सामिया शेख आणि ओम ठोके यांच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदान प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती वैद्यकीय दक्षता घेण्यात आली.

चर्चमधील सदस्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदानासाठी सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याने समाजातील गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचा आदर्श निर्माण केला. या उपक्रमामुळे चर्च सदस्यांमध्येही मानवसेवा आणि सामाजिक एकतेची भावना अधिक दृढ झाली.स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेले हे रक्तदान शिबिर देशसेवा, मानवसेवा आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश देणारे ठरले. स्वातंत्र्यदिन केवळ उत्सव म्हणून न साजरा करता समाजोपयोगी उपक्रमातून देशाप्रती आणि मानवतेप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पास्टर डॉ. सुनील आणि पास्टर ग्लोरी यांनी सर्व रक्तदाते, समता रक्त केंद्राचे डॉक्टर व कर्मचारी तसेच उपक्रमासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.






























