ठाणे दि ८ ( प्रमोद दळवी ) : विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना.बांडोडकर विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातिल क्लब ऊर्जा अंतर्गत ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय आवर्त सारणी दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित भूमकर, केमिस्ट्री क्लबचे समन्वयक डॉ. प्रल्हाद वाघ, कार्यक्रम समन्वयक प्रा. जयदीप वाबळे तसेच इतर प्राध्यापकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. क्लबचे समन्वयक डॉ प्रल्हाद वाघ यांनी आपल्या स्वागतपर भाषणात राष्ट्रीय आवर्त सारणी दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की आवर्त सारणी ही रसायनशास्त्राची पाया असून आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट तिच्याशी जोडलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि नवोपक्रमाची प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले. विभाग प्रमुख डॉ अजित भूमकर यांनी आवर्त सारणीचे महत्त्व विषद केले व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातील विविध उपक्रमांत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रम समन्वयक प्रा. जयदीप वाबळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून आवर्त सारणी दिनाचे विशेष महत्त्व सांगितले व वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी विद्यार्थी यांनी स्पर्धेमध्ये सहभागी होणे किती महत्वाचे आहे हे सांगून सर्वच उपक्रमांमध्ये विद्यार्थी यांनी यश अपयश न बघता सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

वक्ते प्रा. रुपेश बच्छाव यांनी पिरिऑडिक टेबलची उत्क्रांती, घटकांचे महत्त्व आणि संशोधनातील त्यांचे स्थान यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.या विशेष दिवशी विद्यार्थ्यांमध्ये रसायनशास्त्राविषयी आवड निर्माण व्हावी आणि आवर्त सारणीचे महत्त्व अधोरेखित व्हावे, या उद्देशाने पोस्टर प्रेझेंटेशन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विभागाचे प्राध्यापक श्री. ऋषिकेश लभाडे यांनी पोस्टर्सचे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने परीक्षण केले.विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आवर्त सारणीच्या इतिहासापासून ते आधुनिक उपयोगांपर्यंत विविध विषयांवर आकर्षक पोस्टर्स सादर करून आपली सर्जनशीलता आणि शास्त्रीय दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला. क्विझ स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी ज्ञान व तर्कशक्ती यांचे उत्तम प्रदर्शन केले.स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रग्या दुबे यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऊर्जा क्लब विद्यार्थी सचिव हर्षदा राऊत, सहसचिव नील पाचकुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी डॉ. रुपेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानत आभारप्रदर्शन केले. रसायनशास्त्र विभागाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे राष्ट्रीय ‘आवर्त सारणी दिन’ साजरा करण्याचा हा उपक्रम ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.





























