उल्हासनगर, दि. २८ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेने राज्य शासनाच्या “१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम” अंतर्गत राबविण्यात आलेल्या कामगिरी मूल्यांकनात उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल महानगरपालिकेच्या आयुक्त मा. सौ. मनीषा आव्हाळे यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राज्यातील विविध महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ई-गव्हर्नन्स प्रणालीचा प्रभावी वापर, नागरिकांना जलद, पारदर्शक व सुलभ सेवा पुरवणे, तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम बनवणे या उद्देशाने “१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम” राबविण्यात आली होती.
उल्हासनगर महानगरपालिकेने नागरिकाभिमुख उपक्रम राबवत ऑनलाइन सेवा वितरण, मालमत्ता कर व पाणी बिलांचे डिजिटल भरणे, तक्रार निवारणासाठी आधुनिक प्रणाली, तसेच विविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासन अधिक कार्यक्षम केले आहे. या सर्व बाबींमुळे महानगरपालिकेची कामगिरी राज्यस्तरावर विशेष ठरली. विशेष म्हणजे, सन २०२५ मध्ये देखील उल्हासनगर महानगरपालिकेने मुख्यमंत्री यांच्या “१०० दिवस कार्यालय सुधारणा कार्यक्रम” अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. या सलग यशामुळे महानगरपालिकेची कार्यक्षमता व प्रशासनातील सातत्यपूर्ण सुधारणा अधोरेखित होत आहे.
या यशाबद्दल आयुक्त सौ. मनीषा आव्हाळे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, “ही कामगिरी संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. ‘१५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम e-Governance सुधारणा मोहीम’ यशस्वीपणे राबविण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. यापूर्वी ‘१०० दिवस कार्यालय सुधारणा कार्यक्रम’ मध्ये मिळालेल्या प्रथम क्रमांकानंतरही आम्ही सुधारणा सुरू ठेवली असून, भविष्यातही नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगितले. महानगरपालिकेच्या या यशामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, नागरिकांना अधिक दर्जेदार व डिजिटल सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.





























