उल्हासनगर दि २७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरात आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या १९ वर्षीय मुलीच्या प्रेमसंबंधांना विरोध करत एका आईने रागाच्या भरात तिचाच स्कार्फने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प नं – २, भैय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून तिच्याविरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव अमृता गरड (वय १९) असे असून ती आपल्या आई आणि कुटुंबीयांसोबत भैय्यासाहेब आंबेडकर नगर परिसरात राहत होती. अमृताचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तिची आई आशा गरड (वय ४०) हिला मिळाली होती. या कारणावरून आई-मुलीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास प्रेमसंबंधांच्या मुद्द्यावरून दोघींमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान अत्यंत भीषण स्वरूपात झाले. रागाच्या भरात आशा गरड हिने मुलगी अमृता हिचा स्कार्फने गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
सोमवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अमृताचा मृतदेह विच्छेदनासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीदरम्यान हत्येचे धक्कादायक कारण समोर आले. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आई आशा गरड हिला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी सांगितले की, अमृता गरड हिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून आई-मुलीमध्ये वाद होत होते. रविवारी मध्यरात्री झालेल्या भांडणादरम्यान रागाच्या भरात आशा गरड हिने स्कार्फने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आईनेच आपल्या मुलीचा जीव घेतल्याच्या घटनेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.





























