( प्रमोद दळवी )
उल्हासनगर दि. 3 : उल्हासनगर शहरात सध्या सर्वत्र रस्ते खोदण्याचे काम वेगाने सुरू आहेत. खोदण्यात आलेल्या या रस्त्यांमुळे शहरातील रस्ते नाहीसे झाल्याचे दिसत आहेत. मात्र या खोदलेल्या खड्ड्यात नेहमीच किरकोळ अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. याशिवाय खोदलेले खड्डे व्यवस्थित बुजवले जात नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताच्या ही घटना घडत आहेत. या खोदलेल्या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय धुळीचे साम्राज्य देखील शहरात पसरले आहे. यामुळे शहरात सध्या रोगराई देखील पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकताच उल्हासनगर शहरातील कॅम्प नं- ४ सेक्शन २८ मधील रस्त्याच्या मध्ये ड्रेनेजसाठी खोदलेल्या सहा फूट खोल खड्ड्यात भाटिया नावाचा वयोवृद्ध इसमजखमी झाल्याची घटना घडली आहे.

भाटिया हे पहाटे सत्संगला जाण्यासाठी पाय निघाले होते यावेळी रस्त्यात ड्रेनेजसाठी खोदलेला खड्ड्यात ते पडल्यावर त्यांनी जोर जोराने आवाज देण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा काही नागरिकांनी त्यांचा आवाज ऐकून त्यांना खड्ड्यातून बाहेर काढले. खड्ड्यात पडल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ड्रेनेजसाठी खोदलेला खड्ड्यांमुळे वारंवार होत असलेल्या अपघाताच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने या गंभीर समस्येवर त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात आहे. याशिवाय कामात बेजबाबदारपणा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची ही मागणी केली जात आहे. रस्त्यामध्ये खोदकाम करताना ठेकेदार सुरक्षतेबाबत कोणतीही काळजी घेत नसल्याचे घडलेल्या घटना वरून दिसून येत आहे.





























