उल्हासनगर दि ११ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर रेल्वे स्थानकात सकाळच्या सुमारास प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. त्यात सकाळच्या रेल्वे गाड्या पकडण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. पास धारक रेल्वे प्रवासी आहेत ते गाडी पकडण्यासाठी त्वरित जातात, पण ज्याच्याकडे पास नाहीत त्यांना रेल्वे तिकीट काढूनच प्रवास करावा लागतो. पण अशा वेळेस सकाळच्या सुमारास कामाच्या वेळेस जर चार पैकी तीन रेल्वे टिकीट काउंटर बंद असतील तर प्रवाशांनी तिकीट कुठे काढावे. त्यात एकच काउंटर चालू असेल तर प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण तर पसरणारच. असाच प्रकार उल्हासनगर रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी १०.१५ ते १०.३० दरम्यान पाहायला मिळाला. हा प्रकार पाहून ॲड प्रशांत चंदनशिव यांनी त्वरित फोटो काढून रेल्वे प्रशासनाला ट्विट करत आशा रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच लेखी निवेदन देखील उल्हासनगर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक यांना दिले आहे.

ॲड प्रशांत चंदनशिव यांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर पूर्व येथील रेल्वेचे एकूण ४ तिकीट खिडक्या चालू असतात. तसेच उल्हासनगर पश्चिम येथे २ तिकीट खिडकी आहेत. सकाळच्या सुमारास कामावर जाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सकाळी सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत लाखो प्रवासी उल्हासनगरातून रेल्वेने मुंबई प्रवास करत असतात. प्रवाशांच्या सेवेसाठी उल्हासनगर पूर्व येथील रेल्वेचे ४ तिकीट खिडक्या चालू असतात. याशिवाय त्या चारही खिडक्यांना ठराविक वेळ देखील देण्यात आली आहे. पण १० जून २०२५ रोजी मंगळवारी सकाळी १०.१५ ते १०.३० दरम्यान रेल्वे तिकीट क्रमांक १ व ३ या दोन्ही रेल्वे तिकीट खिडक्या दिलेल्या वेळेत सुरू नव्हत्या त्या बंद करून ठेवण्यात आल्या होत्या. तिकीट क्रमांक १ येथील कर्मचारी भोजन तसेच लेखा या कामाकरिता खिडकी बंद असल्याची पाटी त्यांनी लावून ठेवली होती व तो आपले काहीतरी काम करत होता. खिडकी क्रमांक ३ चा कर्मचारी खिडकी समोर परधा लावून गया होता. पण तो कुठे गेलाय त्याची कल्पना कोणालाच नव्हती. फक्त एकच रेल्वे तिकीट काउंटर चालू होते. या काउंटरवर देखील प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात सकाळच्या सुमारास गाड्यांची वेळ आणि तिकीटला लागलेल्या रांगा पाहून प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. त्याच दरम्यान ॲड प्रशांत चंदनशिव रेल्वे स्थानकात असताना त्यांना हा प्रकार निर्देशनात आला. त्यांनी त्वरित त्या दोन्ही खिडकीचे फोटो काढून रेल्वे प्रशासनाला ट्विट केले. तसेच एक लेखी निवेदन तयार करून उल्हासनगर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक मॅडम यांना देण्यात आले. या निवेदनात ॲड प्रशांत चंदनशिव यांनी दिलेल्या कामाच्या वेळेत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी तसेच जर रेल्वे तिकीट काउंटर बंद ठेवायचे असतील तर रेल्वे स्थानकात टी.सीची गरजच काय. दिलेल्या वेळेत रेल्वे तिकीट काउंटर बंद असतील तर प्रवाशांनी तिकीट काढायचे कुठे असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला केला आहे. आता यावर रेल्वे प्रशासन या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करणार याकडे ॲड प्रशांत चंदनशिव लक्ष लावून आहेत





























