उल्हासनगर दि. १८ ( प्रमोद दळवी ) : २१ जून रोजी होणारा आंतरराष्ट्रीय योग दिन भव्य आणि यशस्वीपणे साजरा करण्यासाठी उल्हासनगरमधील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक सोमवारी आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात पार पडली.

या बैठकीत योग दिनाच्या कार्यक्रमावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जास्तीत जास्त नागरिकांचा विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले की, योग हे केवळ शारीरिक आरोग्याचेच नव्हे, तर मानसिक संतुलन आणि सकारात्मक जीवनशैलीचेही साधन आहे. त्यांनी सर्व संघटनांना योग दिनाच्या कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष देविदास भारवानी यांच्यासह विविध संघटनांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा, व्यवस्था आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या मार्गांवरही चर्चा झाली. योग दिनाच्या यशासाठी येत्या काही दिवसांत विविध स्तरांवर जनसंपर्क अभियान आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जातील असे आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले .





























