- नगरपालिका कुत्रे पकडत नसल्याने अधिकाऱ्यांनाच पकडण्यासाठी नगरसेवक जाळे घेऊन नगरपालिकेत
अंबरनाथ दि. २४ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसान दिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात मंगळवारी सकाळी वांद्रापाडा परिसरात राहणाऱ्या वंशिका नागर या विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची खळबजनक घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहेत. भटक्या कुत्र्याचा हा थरार हल्ला सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. जखमी विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी देखील अंबरनाथ मध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेची दखल घेत अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने स्वान पथक घटना घडलेल्या ठिकाणी पाठवून त्या परिसरातील जवळपास १८ स्वानांना व्हॅक्सिनेशन करण्याकरिता ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे नगरपालिका प्रशासनाला वारंवार भटके व मोकाट कुत्रे पकडण्यासाठी सांगूनही ते ऐकत नसल्याने त्यांच्या निष्काळचीपणामुळे आशा घटना वारंवार शहरात घडत असल्याने संताप्त झालेल्या शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी चक्क नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाच पकडण्यासाठी जाळी घेऊन नगरपालिकेत शिरल्याने सर्वत्र एकच खळबळ झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ येथील वांद्रापाडा परिसरात राहणारी वंशिका नागर ही विद्यार्थ्यांनी सकाळी आपल्या भावासोबत घरी जात होती. त्यावेळी अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला करत तिला ओढत नेले. वंशिका हिने कुत्र्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला असता त्या भटक्या कुत्र्याने तिला गंभीर चावा घेऊन जखमी केले. त्यावेळी परिसरातील काही नागरिकांनी हा प्रकार पाहताच वंशिका हिला त्या भटक्या कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली. जखमी वंशिका हिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून ती गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत असल्यामुळे लहान मुले भीतीच्या वातावरणातच शाळेत जात असतात. अंबरनाथ मध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढतात त्रास पुन्हा एकदा या घटनेमुळे समोर आला आहे. अंबरनाथ प्रशासनाच्या निष्काळचीपणावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे प्रशासनाने ठोस उपयोजना राबवावी अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपयोजना करण्याची ही मागणी केली आहे.

या घटनेबाबत अंबरनाथ नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी महेश तायडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले या घटनेची माहिती आम्हाला मिळताच आम्ही तातडीने त्या ठिकाणी डॉग स्कॉट पथक पाठवून त्या परिसरातील जवळपास १८ स्वानांना निर्भीजीकरण करण्याकरिता व त्यांना वॅक्सिनेशन करून सात दिवसानंतर पुन्हा त्यांना सुरक्षित स्थळी सोडून देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. भटक्या, चावक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांवर कारवाई करताना बराच वेळा प्राणी मित्रांकडून कारवाई मध्ये अडथळा ठरत असल्याचे तायडे यांनी सांगितले .तसेच या भटक्या कुत्र्यांवर कारवाई केली नाही तर दुसरीकडे नागरिकांमध्ये देखील आमच्याविरुद्ध संताप प्रक्रिया उमटत असतात. आम्ही पकडण्यात आलेला स्वानांना व्हॅक्सिनेशन देऊन पुन्हा सोडत असतो त्या प्राण्यांची काळजी घेतली जाते. नगरपालिकेने अंबरनाथ शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी खाजगी संस्थेला हा ठेका दिला असून या संस्थेमार्फत शहरातील भटकी कुत्री पकडून त्यांचे निर्भीजीकरण करून त्यांना व्हॅक्सिनेशन देऊन पुन्हा पकडलेल्या परिसरात सोडून देण्यात येते असे देखील तायडे यांनी सांगितले. दुसरीकडे अंबरनाथ मधील या भटक्या कुत्र्यांवर अंबरनाथ नगरपालिका कोणतीच उपयोजना राबवत नसल्याने व शहरात वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे संतप्त झालेले शिवसेने नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी चक्क निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी नगरपालिकेत जाळे घेऊन गेल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.





























