उल्हासनगर दि. २७ : “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिका येथे शुक्रवारी दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता आढावा बैठक पार पडली.

सदर बैठकीमध्ये समागम कार्यक्रमासाठी उल्हासनगर शहरातून ०४ अँम्बुलन्ससह वैद्यकिय पथक तसेच सुमारे ५० बसेसद्वारे भाविकांना नेण्याबाबत नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच समागमासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व नाश्त्याची व्यवस्था, तसेच वाहतूक व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. समागम कार्यक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या व करावयाच्या कामाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच समागमाच्या ठिकाणी १० हजार लिटरचे १० टँकर व आरोग्य वैद्यकिय पथक यांची उल्हासनगर महानगरपालिके कडुन व्यवस्था करण्यात आली आहे.
या बैठकीस उल्हासनगर महापौर श्रीम. अश्विनी कमलेश निकम, अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार श्रीम. कल्याणी कदम, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ, नगरसेवक राजेंद्रसिंह विरसिंह भुल्लर (भुल्लर महाराज), परिवहन विभागप्रमुख विनोद केणे, भांडार विभागप्रमुख अंकुश कदम, समन्वय समितीचे सदस्य तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.समागम कार्यक्रम सुरळीत, सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
उल्हासनगर महानगरपालिकेचे नियोजन -(१) ५० बसेस (मनपा कर्मचारी आणि अधिकारी यांच्या नियुक्त्यासहित). बसेस मध्ये भाविकांसाठी खानपान सेवा, चॉकलेट्स आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात येतील.(२) ४ वैद्यकीय रुग्णवाहिका ( ९ डॉक्टर आणि६ पॅरामेडिकल कर्मचारी) सहित दिल्या आहेत तसेच या व्यतिरिक्त ४ मेडिकल ऑफिसर्स २ दिवसासाठी नियुक्ती केली आहे. (३) २५० ml च्या दोन लाख पाण्याच्या बाटल्या देण्यात येणार आहे (४) १० पाण्याचे टँकर देण्यात येणार आहे.





























